अब्दुल सत्तारांच्या बंडाचा खा. खैरे, खा. रावसाहेब दानवेंना होणार लाभ; सिल्‍लोडच्या समर्थकांमध्येच नाराजीचा सूर

Foto
 काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. अब्दुल सत्तार यांच्या बंडळीमुळे काँग्रेसच्या मताचे विभाजन होऊन भाजप-शिवसेना युतीचे खा. चंद्रकांत खैरे आणि जालना मतदारसंघातील खा. रावसाहेब दानवे यांनाच फायदा होणार आहे. त्यामुळे सत्तार समर्थकांमध्येच नाराजीचा सूर उमटत आहे. त्यामुळे शुक्रवारच्या जाहीर सभेत सत्तार आपली तलवार म्यान करणार असल्याचे बोलले जात आहे. 

काँग्रेसचे बंडखोर आ. अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून उमेदवार देताना आपल्या पक्षाने विश्‍वासात घेतले नसल्याने काँग्रेसचा राजीनामा देत अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय कार्यकर्त्यांवर सोपविला आहे. पण आ. सत्तारांची ही खेळी त्यांच्याच सिल्‍लोड-सोयगाव विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या पचनी पडला नाही. सिल्‍लोडमध्ये सोमवारी रात्री झालेल्या सत्तार समर्थकांच्या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी औरंगाबाद ऐवजी जालना मतदार संघातून निवडणूक लढवावी. आम्ही औरंगाबादला येऊन करणार काय असा प्रश्‍न उपस्थित केला असून सत्तारांच्या बंडामुळे खा. रावसाहेब दानवे व खा. चंद्रकांत खैरे यांनाच फायदा होणार असल्याचा सूर काढण्यात आला. त्यामुळे आ. सत्तार यांची चांगलीच अडचण झाली आहे. आ. अब्दुल सत्तार हे सिल्‍लोड,सोयगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. हा मतदार संघ जालना लोकसभा मतदार संघात येतो. पण अब्दुल सत्तार यांनी औरंगाबादमधून निवडणूक लढविण्याचा घेतलेला निर्णय समर्थकांना आवडला नाही. तालुक्यातील बहुतांश कार्यकर्ते आणि नेत्यांनी निवडणूक लढवायचीच असेल तर जालना मतदार संघातून लढा असे स्पष्टपणे सांगितले. सत्तारांच्या बंडामुळे युतीच्या औरंगाबाद अणि जालना मतदार संघातील नेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्यांचा विजय निश्‍चित होत आहे. खा. रावसाहेब दानवे आणि आ. अब्दुल सत्तार यांचे साटेलोटे असल्याची चर्चा यापूर्वीही तालुक्यात होती. आता सत्तारांच्या बंडामुळे त्याला पुष्टी मिळत असल्याचेही बोलले जात आहे. 

सत्तारांची प्रतिज्ञा अपूर्ण राहणार 
अब्दुल सत्तार यांनी तीन वर्षापूर्वी खा. रावसाहेब दानवे यांचा पराभव केल्याशिवाय भांग पाडणार नाही, अशी प्रतिज्ञा घेतली होती. पण सत्तारांनी केलेल्या बंडामुळे त्यांच्याच मतदार संघातील कार्यकर्ते बुचकळ्यात पडले आहेत. सत्तार यांना मानणाराहर हिंदू मतदार मोठ्या संख्येने आहे. पण आ. सत्तार जर औरंगाबादेतून रिंगणात उतरले तर सिल्‍लोड सोयगावातील हिंदू मतदार हे भाजपाकडे वळून दानवेंचा विजय निश्‍चित होणार आहे आणि सत्तारांनी घेतलेली प्रतिज्ञा पूर्ण होणार नाही.